पूर्वीचे लोक 'परान्न' का टाळत असत,
आपण 'अन्न हे पूर्णब्रह्म' मानतो. परंतु सद्यस्थितीत आपण अन्नग्रहण करताना कुठलेच नियम पाळत नाही. अरबट-चरबट खात राहतो. त्या खाण्याचे परिणाम आपल्या शरीरावरच नाही, तर मनावरदेखील होतात. अन्नग्रहण हा एक संस्कार आहे. तो योग्य रितीने पाळला गेला पाहिजे, असा पूर्वीच्या लोकांचा कटाक्ष असे.
साधकावस्थेमध्ये आणि सिद्धावस्थेमध्येसुद्धा आहाराकडे सूक्ष्म स्तरावर लक्ष ठेवावे लागते. एक सिद्धान्त असा आहे, की प्रत्येक माणसाभोवती त्याच्या वृत्तीचे वलय असते. अर्थातच तो माणूस ज्या ज्या वस्तूंना स्पर्श करतो, त्याच्यावर त्याच्या वृत्तीचा ठसा उमटतो, हाच संस्कार होय. सुंस्कारित व्यक्तीकडून शिजवले गेलेले अन्न साधकाला तारक असते. तसेच खाण्याचा पदार्थही दोषविरहित असावा लागतो. करण त्याचेही परिणाम साधकावर होतात.
परमपूज्य योगी अरविंदबाबूंचे आज्ञापालन करीत असताना एकदा एक लहानशी चूक माताजींच्या हातून घडली. एका जुन्या ओळखीच्या घरचे त्यांनी जेवणाचे निमंत्रण स्वीकारले. बोलावणारी व्यक्ती सुसंस्कारित होती. जेवणाचा बेतही स्वच्छ, स्तुत्य होता. सुंदर वैचारिक पातळीवर भोजन झाले.
माताजी आश्रमात परतल्या, परंतु काय झाले कुणास ठाऊक? प्रत्येकाचा गळा दाबून ठार मारावे, अशी ऊर्मी माताजींच्या मनात समुद्रलहरींप्रमाणे उसळ्या मारू लागली. पहिल्यांदा या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, परंतु ती ऊर्मी, पकड घट्ट करीत आहे हे लक्षात येताच माताजी भांबावल्या. योगी अरविंदबाबूंच्या खोलीत जाऊन त्यांनी हा सर्व प्रकार सांगितला. योगी अरविंदबाबूंना सर्व प्रकार समजला. ते म्हणाले, 'तू जिथे अन्न खाल्लेस ती माणसे चांगली होती, परंतु जेवण बनवणारा आचारी पूर्वी खाटिक होता. त्याच्या वृत्तीप्रमाणे जेवण बनवताना मनात हिंस्र विचार होते. म्हणून ते अन्न खाताना त्याच्या मनोलहरी अन्नात उतरल्या आणि तुझ्या मनोलहरींशी जुळल्या. म्हणून तुझ्याही मनात तसेच विचार आले.'
हा अनुभव वाचल्यावर आपल्याला कदाचित अतिशयोक्ती वाटू शकेल. परंतु, आपण स्वत:चे नीट परिक्षण केले, तर अन्न सेवनानंतर आपल्या मनोवृत्तीत घडणारे बदल आपल्याला सहज लक्षात येतील. म्हणून पूर्वीच्या काळी लोक परान्न टाळत असत. केवळ घरी केलेले भोजन ग्रहण करत असत.
परंतु, सद्यस्थिती अशी आहे, की आपण घरात कमी आणि बाहेर जास्त खातो. अशा वेळी अन्नावर झालेले संस्कार कसे टाळायचे, त्यावर मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामी पर्याय सुचवतात, हरी नाम घेत शांतचित्ताने अन्नसेवन करा, जेणेकरून ते दोषविरहित असेल.
जनी भोजनी नाम वाचे वदावे,
अती आदरे गद्यघोषे म्हणावे,
हरीचिंतने अन्न सेवीत जावे,
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे।। श्री समर्थ रामदास स्वामी
No comments:
Post a Comment