Monday, June 01, 2026

Changadeva Pashashti. सार्थ श्री चांगदेव पासष्टी



     सार्थ श्री चांगदेव पासष्टी

चांगदेव हे महाराष्ट्रातील नाथपंथी कवी आणि संत होते.
चांगदेव हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे.. यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप). तापी-पयोष्णीच्या तीरावरील चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करीतच हे योगी झाले होते. त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांंना चांगदेव म्हणू लागले.

एकदा त्‍यांच्या कानावर संत ज्ञानेश्वराची कीर्ती पडली तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली, भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करून त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी कोरेच पत्र पाठविले. योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर चांगदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली. पुढे चांगदेवांनी मुक्ताबाईंनागुरू मानले. सन १३०५ (शके १२२७)मध्ये चांगदेवांनी समाधी घेतली. 
चांगदेव राऊळ

चक्रधरस्वामींच्या काळात होऊन गेलेले (पंचावतारातला चौथा अवतार समजले गेलेले) चांगदेव राऊळसा हे वेगळे चांगदेव आहेत. पुर्णा आणि तापी नदयांचा संगमापासून जवळच चांगदेव नावाचे गांव आहे. हे गांव ज्ञानदेवांच्या काळात वटेश्वर या नावाने ओळखले जायचे. नंतर गावाचे चांगदेव हे नांव तेथे वास्तव्य करणार्या् चांगदेवांमुळे पडले.

सार्थ चांगदेवपासष्टी
स्वस्ति श्रीवटेशु । जो लपोनि जगदाभासु ।
दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥१॥

हे श्री वटेश चांगदेवा ! तुझे कल्याण असो. स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवितो. तो प्रकट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो. ॥१॥

प्रगटे तंव न दिसे । लपे तंव तंव आभासे ।
प्रगट ना लपला असे । न खोमता जो ॥२॥

परमात्म्याचे स्वरूप जेव्हा दिसत नाही तेव्हा जगताची जाणीव होते. तो जेव्हा प्रकटतो तेव्हा दिसतोच असे नाही. विचारान्ती असे दिसेल की, परमेश्वर दिसतही नाही किंवा गुप्तही होत नाही. हे दोन्ही गुणधर्म त्याला स्पर्श करीत नाहीत.॥२॥

बहु जंव जंव होये । तंव तंव कांहींच न होये ।
कांहीं न होनि आहे । अवघाचि जो॥3॥

स्वरूपाने परमात्मा विशाल होत असतां भासमान जगत् नाहींसे होत जाते. वास्तविक परमात्म्याने काही जगाचे रूप घेतलेले नसून सगळीकडे तोच पूर्णपणे व्यापलेला आहे. ॥३॥

सोनें सोनेपणा उणें । न येतांचि झालें लेणें ।
तेंवि न वेंचतां जग होणें । अंगे जया ॥४॥

सुवर्णाचे दागिने घडवितात, परंतु त्यामुळे त्याच्या सोनेपणात मुळीच उणीव निर्माण होत नाही. हे जसे आहे, त्याप्रमाणे स्वतः परमात्मा विविध आकारांनी, रूपांनी नटला तरी त्याच्या मूळ परमात्मा स्वरूपात काहीही कमीपणा येत नाही. ॥४॥

कल्लोळ कंचुक । न फेडितां उघडें उदक ।
तेंवी जगेंसी सम्यक् । स्वरूप जो ॥५॥

पाण्यावर अनेक लाटा उठत असतात. त्यामुळे ते पाणी लाटांच्या आवरणाने झाकलें आहे असे वाटते. तरीही ते पूर्णतया पाणीच असते. हेच परमात्मा आणि जगत् यांच्या बाबतीत आहे. परब्रह्म आणि विश्व यांत काहीही फरक नाही. ॥५॥

परमाणूंचिया मांदिया । पृथ्वीषणें न वचेचि वायां ।
तेंवि विश्वस्फूर्ति इयां । झांकवेना जो ॥६॥

पृथ्वीवर अनेक लहान लहान कण (अणु-परमाणु) आहेत. परमाणु हे पृथ्वीच्या रूपाने आहेत म्हणून काही पृथ्वीचा पृथ्वीपणा नाहीसा होत नाही. त्याचप्रमाणे विश्वाच्या अविष्कारामुळे परमात्मा मुळीच झाकला जात नाही. ॥६॥

कळांचेनि पांघुरणे । चंद्रमा हरपों नेणें ।
का वन्ही दीपपणेम । आन नोहे ॥७॥

कल्पना केली की चंद्रावर त्याच्या सोळा कलांचे आच्छादन घातले आहे, तरीही चंद्राचा निश्चित लोप होत नाही. दिव्याच्या रूपाने अग्नि दिसला तरी तो अग्निच असतो. ॥७॥

म्हणोनि अविद्यानिमित्तें । दृश्य द्रष्टत्व वर्ते ।
तें मी नेणें आईतें । ऎसेंचि असे ॥८॥

चांगदेवा  तुला अज्ञानामुळे (अविद्येने) ज्ञानरूपी आत्मा हा वेगळेपणानें दृश्य आहे आणि मी द्रष्टावेगळा आहे असे भासतें. परंतु मला मात्र वेगळेपणाची जाणीव नाही.॥८॥

जेविं नाममात्र लुगडें । येर्हगवी सूतचि तें उघडें ।
कां माती मृद्‌भांडें । जयापरी ॥९॥

वस्त्रापैकीं एखाद्या वस्त्राला लोक लुगडे म्हणतात. तरीहि लुगडे ज्या सुताचे विणलेले असते त्याचे सूतरूप कायमच असते. माती आणि मातीचे भांडे यांच्या बाबतीत असेच सांगता येईल. ॥९॥

तेंवी द्रष्टा दृश्य दशे । अतीत दृङ्‌मात्र जें असे ।
तेंचि द्रष्टादृश्यमिसें । केवळ होय ॥१०॥

द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जे पाहावयाचे ते अशा दोन्हीच्याही पलीकडे परमात्मतत्त्व ज्ञानस्वरूप असें आहे. हेच द्रष्टा आणि दृश्य या प्रकारांनी अनुभवाला येते. ॥१०॥

अलंकार येणें नामें । असिजे निखिल हेमें ।
नाना अवयवसंभ्रमें । अवयविया जेंवी ॥११॥

अलंकाररूपाने जसे केवळ सुवर्णच असतें किंवा अनेक अवयवांच्या रूपाने अवयवीच असतो.॥११॥

तेंवी शिवोनि पृथीवरी । भासती पदार्थांचिया परी ।
प्रकाशे ते एकसरी । संवित्ति हे ॥१२॥

ईश्वरापासून पाषाणापर्यंत नाना प्रकारे पदार्थांची प्रतीती करून देणारे एक ज्ञानच असतें, म्हणजे त्या त्या आकारानें ज्ञानच परिणाम पावलेंले असते. ॥१२॥

नाहीं तें चित्र दाविती । परि असे केवळ भिंती ।
प्रकाशे ते संवित्ति । जगदाकारें ॥१३॥

भिंतीवर चित्रें दिसली तरी त्या चित्ररूपाने वास्तविक भिंतीचीच प्रतीती असतें, त्याप्रमाणे जगदाकाराने ज्ञानाची म्हणजे परमात्म्याचीच प्रतीती असतें. ॥१३॥

बांधयाचिया मोडी । बांधा नहोनि गुळाचि गोडी ।
तयापरि जगपरवडी । संवित्ति जाण ॥१४॥

गुळाची ढेप केल्याने गोडीला ढेपेचा आकार येत नाही; अगर ढेप मोडल्याने गोडी मोडताही येत नाही. त्याप्रमाणे जगात अनंत प्रकारे द्वैतप्रतीती झाली तरी ती परमात्म्याचीच प्रतीती आहे, द्वैत नाहीच. ॥१४॥

घडियेचेंइ आकारें । प्रकाशिजे जेवीं अंबरें ।
तेंवी विश्वस्फुर्तिं स्फुरें । स्फुर्तिचि हे ॥१५॥

घडीच्या आकारात ज्याप्रमाणे वस्त्र स्पष्ट व्हावें, त्याप्रमाणे परमात्माच विश्वरूपाने स्फुरत असतो. ॥१५॥

No comments:

Post a Comment