Sunday, June 07, 2026

Santha Chokha Mela संत चोखोबांच्या अभंग

           संत चोखोबांच्या अभंग 

चोखोबांचे साडेतीनशेच्या आसपास अभंग उपलब्ध आहेत. याशिवाय संत सोयराबाई, निर्मळाबाई  , बंका व कर्ममेळा यांचेही अभंग उपलब्ध आहेत. चोखोबांच्या अभंगाचे लेखक – अनंत भट्ट नावाचे ब्राह्मण होते असा उल्लेख संत जनाबाईंच्या अभंगात आहे. चोखोबांच्या अभंगांनी आजही भाविकांच्या व रसिकांच्या मनावर मोहिनी घातली आहे

संत चोखोबांचे निवडक अभंग

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥ कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥ नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥ चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलीकापाठीं उभें असे ॥१॥ साजिरें गोजिरें समचरणीं उभें । भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥ कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले । शंख चक्र मिरवले गदापहा ॥३॥ चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥

उतरलें सुख चंद्रभागेतटीं । पाहा वाळुवंटीं बाळरुप ॥१॥
बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचें सुख ब्रह्म ॥२॥ जयालागीं अहोरात्र विवादती । तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥ चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । न कळे ज्याचा पार श्रुति-शास्त्रां ॥४॥


आह्मां नकळे ज्ञान न कळे पुराण । वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥ आगमाची आढी निगमाचा भेद । शास्त्रांचा संवाद न कळे आह्मां ॥२॥ योग याग तप अष्टांग साधन । नकळेची दान व्रत तप ॥३॥ चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझें ॥४॥

संत सोयराबाईंचे (पत्नि) निवडक अभंग

अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूंपण गेले वायां । पाहतां पंढरीच्या राया ॥२॥
नाही भेदाचें तें काम । पळोनि गेले क्रोध काम ॥३॥
देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही ॥४॥
पाहते पाहणें गेले दूरी । म्हणे चोखियाची महारी ॥५॥

देहासी विटाळ म्हणती सकळ । आत्मा तो निर्मळ शुद्धबद्ध ॥१॥ देहींचा विटाळ देहीच जन्मला । सोवळा तो झाला कवण धर्म ॥२॥ विटाळावाचोनी उत्पत्तीचे स्थान । कोण देह निर्माण नाही जगीं ॥३॥ म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी । विटाळ देहांतरी वसतसे ॥४॥ देहाचा विटाळ देहींच निर्धारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥५॥


अहो पंढरीच्या राया । दंडावत तुमच्या पाया ॥१॥
तूंचि उदार त्रिभुवनीं । ऋध्दि सिध्दि तुझे चरणीं ॥२॥
भुक्तिमुक्तिचा तूं दाता । मी तों काय वानूं आता ॥३॥
बैसेन महाद्वारी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥

संत कर्ममेळा (पुत्र) चे निवडक अभंग

आमुची केली हीन याती । तुज कां न कळे श्रीपती ॥१॥
जन्म गेला उष्टे खातां । लाज न ये तुमचे चित्ता ॥२॥
आमचे घरीं भात दहीं । खावोनी कैसा म्हणसी नाहीं ॥३॥ म्हणे चोखियाचा कर्ममेळा । कासया जन्म दिला मला ॥४॥

अखंड तें मन ठेवलें चरणीं । आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥ गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें । सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥ वायां तोंडपिटी करा कशासाठी । तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥ कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं । मागणे तें देई हेंचि एक ॥४॥


जें जें दिसें व्यापलें तें तें फलकट । वाउगा बोभाट करोनी काई ॥१॥ विश्वीं विश्वंभर संतांचें वचन । तेंचि प्रमाण मानूं आतां ॥२॥ नामाची आवडी परमार्थ रोकडा । नासे भव पीडा संसाराची ॥३॥ कर्ममेळा म्हणे सुलभ सोपारें । साच हेंचि खरें वर्म एक ॥४॥

संत निर्मळा (बहिण) व संत बंका (मेव्हणा) चे निवडक अभंग

अनाथांचा नाथ कृपावंत देवा । घडो तुमची  सेवा अहर्निशीं ॥१॥ अठ्ठाविस युगें विटेवरी उभा । वामभागीं शोभा रुक्मादेवी ॥२॥ पतित पावन गाजे ब्रीदावळी । पुरवावी आळी हीच माझी ॥३॥ उभा विटेवरी ठेवोनी चरण । म्हणतसे बहिण चोखियाची ॥४॥

आनंदें वोविया तुम्हासी गाईन । जीवें भावें वोवाळीन पायांवरी ॥१॥ सुकुमार साजिरीं पाउलें गोजिरीं । ते हे मिरवली विटेवरी ॥२॥ कटावरी कर धरोनी श्रीहरी । उभा भीमातीरी पंढरीये ॥३॥ महाद्वारीं चोखा तयाची बहिण । घाली लोटांगण उभयतां ॥४॥

ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर माउली । खेचरा वोळली कृपासिंधु ॥१॥ ज्ञानदेवा चरणी खेचर शरण । नामदेवा पूर्ण कृपा केली ॥२॥ नामदेवें हात चोखियाचे शिरी । विठ्ठल ती अक्षरी उपदेशिले ॥३॥ बंका म्हणे माझा चोखा गुरु माउली । तयाचे पाउलीं लोटांगण ॥४॥

चोखा चोखट निर्मळ । तया अंगी नाही मळ ॥१॥
चोखा सुखाचा सागर । चोखा भक्तिचा आगर ॥२॥
चोखा प्रेमाची माउली । चोखा कृपेची साउली ॥३॥
चोखा मनाचें मोहन । बंका घाली लोटांगण ॥४॥

नकळे वो माव आगमा निगमा । जयाचा महिमा श्रुति शास्त्रां ॥१॥ तो म्यां डोळेभरी पाहिला श्रीहरी । भीवरेचे तिरीं विठ्ठलरूप ॥२॥ सुखाचा सागर भक्तांचा कैवारी । ब्रीद चराचरी गाजतसे ॥३॥ बंका म्हणे ऐसा जयाचा महिमा । सुलभ तो आम्हां भाविकांसी ॥४॥
समाप्त

No comments:

Post a Comment