युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।
जय देव जय देव ।। धृ० ।।
तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ।। २ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।
धन्य वेणूनाद अनुक्षेत्र पाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती ।
चंद्रभागे माजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागे मध्ये स्नान जे करिती ।
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवाचे नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।|
जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।
रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।
जय देव जय देव ।।
रचनाकार – संत नामदेव महाराज
No comments:
Post a Comment